केळीच्या रोपांच्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यात केळी लागवडीचे क्षेत्र वाढत असताना केळींच्या रोपाचा काळाबाजार सुरू झाला आहे. केळी रोपाची कंपनीची मूळ किंमत १८ रुपये ७५ पैसे असताना केळीचे वितरक शेतकऱ्याला ३० रुपयाला विकत आहेत. याबाबत तालुक्यातील वांगी नंबर ३ येथील शेतकरी अजिनाथ पांढरमिसे, केशव खानट व भारत तावसे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या प्रकाराविषयी लेखी तक्रार निवेदनाद्वारे केलेली आहे.
करमाळा तालुक्यात तब्बल १४००० हेक्टर क्षेत्रावर केळी रोपाची लागवड होत आहे. जैन कंपनीची जी नाईन जातीची केळी रोपांची लागवड सर्रास केली जाते. एका रोपाची कंपनीमार्फत असलेली मूळ किंमत १८ रुपये ७५ पैसे आहे; परंतु तालुक्यातील वितरक प्रतिरोप ३० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना विकून त्यांची पिळवणूक करत आहेत. केळी रोपांच्या जैन कंपनीकडे तालुक्यातील वितरक स्वतःच्या नावाने प्रति रोप ६ रुपये याप्रमाणे पाच, दहा ते वीस लाख याप्रमाणे रोपांचे बुकिंग करून ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे मिळत नाही. तेच रोप वितरक काळ्या बाजारात तब्बल एक रोप ३० रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना विकून लाखो रुपयांची कमाई करू लागले आहेत. यामध्ये जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही संगनमत व सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.