करमाळ्यात शिवभक्तीचा महोत्सव : 15 मे ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांची शिवमहापुराण कथा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरात पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळणार आहे. भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती आणि संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 21 मे या कालावधीत प्रसिद्ध प्रवचिका स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या वाणीतील शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी ही माहिती दिली.
करमाळा शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेली आहे. यापूर्वी येथे ओतूरकर महाराजांची भागवत कथा, पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांची शिव महापुराण कथा, रामराव ढोक महाराज यांची रामकथा, तसेच भगवानजी शर्मा यांच्या भागवत व रामकथा आणि अलीकडेच अनुराधा दीदी यांच्या भागवत कथेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले होते. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता.
याच परंपरेला पुढे नेत, अधिकमासाच्या पावन पर्वात भाविकांना शिवभक्तीचा लाभ मिळावा, तसेच पुण्यसंचयाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यंदाचा शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सात दिवस चालणाऱ्या या कथेच्या माध्यमातून भगवान शंकराच्या विविध लीलांचे, तत्वज्ञानाचे आणि भक्तीमार्गाचे सखोल विवेचन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सोमवार, 5 एप्रिल रोजी संत गजानन महाराज मंदिर, करमाळा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत श्रेणिकशेठ खाटेर यांच्यासह विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण, रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे, बबलू कुलकर्णी, पत्रकार दिनेश मडके, गिरीश शहा, दादासाहेब तनपुरे, प्रितम वीर, शंकर रासकर, राम टांगडे, सचिन सोरटे, संगीताताई खाटेर, हनुमान परदेशी, संदीप चुंग, आशिष बोरा, दिनेश मुथ्था, वैभव दोशी, कालिंदी धोकेटे, कालीदास घोगरे, आडकर सर, विनोद कानडे, दिलीप शिरगिरे, मुळे सर, सुरेश आटोळे, देवकर काका आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान हा धार्मिक सोहळा “भव्य आणि दिव्य” स्वरूपात पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून नियोजनाची रूपरेषाही आखण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या सातदिवसीय शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


