अखेर भाऊसाहेब मुक्त झाले…

“जन्म कुठे घ्यावा आणि मृत्यू कुठे यावा हे माणसाच्या हातात नसतं. पण जन्मानंतर कसं जगायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं,” असं आपण नेहमी ऐकतो. पण खरंच असं आहे का? ज्यांच्यावर परमेश्वरानेच अन्याय केलेला असतो, ज्यांना निसर्गानेच जीवनात अडचणी दिलेल्या असतात, त्यांनी कसं जगावं? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. पोथरे येथील भाऊसाहेब ज्ञानदेव झिंजाडे यांचं जीवन हाच त्याचा एक जिवंत दाखला आहे.
वडील कै. ज्ञानदेव झिंजाडे हे शिक्षक, आई सुमन गृहीणी,मोठी बहीण मंगल ती ही अशीच मानसीक रुग्ण व त्या आजारातच ती गेली. अन्य तीन बहिणी जाई पिंपळे, सीता आवटे (श्रीगोंदा)तर राधा ढवळे (हळगाव, हल्ली सुरत) या त्यांच्या घरी आहेत., भाऊसाहेबांनी चौथीपर्यंतच शिक्षण घेतलं. लहानपणी झालेल्या आजारपणामुळे त्यांना मतिमंदत्व आलं. मानसिक उपचार योग्य वेळी व सातत्यांने झाले नाहीत. वडील शिक्षक असूनही व्यसनी असल्याने परिवाराला सुख मिळाले नाही आणि भाऊसाहेबांना पुरेसे उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्यांना आयुष्यभर जगाच्या चौकटी बाहेरचं जीनं जगावं लागलं.
भाऊसाहेबांना ना कपड्याचं भान, ना खाण्याचं भान, ना आअंघोळीचं भान, ना दाढी-कटिंगचं भान, ना शौचालयाचं भान… अशा अवस्थेतही ते जवळपास ५२ वर्षे जगले. यातना भोगल्या, पण जगत राहिले.
अशा या भाऊसाहेबांसाठी वडील गेल्यानंतर व आई आजारी पडल्यावर मुलींनी तिला नेले. त्यानंतर गेल्या चार वर्षापासून खरा आधार ठरले ते लक्ष्मीकांत उर्फ पिंटू नवनाथ झिंजाडे. त्यांनी सख्या भावासारखीच सेवा केली. भाऊसाहेबांची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायत दरबारी प्रयत्न करून घरकुल मिळवलं, घर बांधून दिलं. जिथे लागेल तिथे स्वतःचे पैसे खर्च केले. एवढेच नाही तर भाऊसाहेबांना आंघोळ घालणं, कपडे घालणं, जेवायला देणं, त्याचं घर स्वच्छ करणं, कपडे धुणं, झोपल्यावर पांघरूण घालणं – अशी अनंत प्रकारे सेवा केली.
म्हणतात, “ अशा व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वरभक्ती असते ” तशीच सेवा लक्ष्मीकांत झिंजाडे यांनी केली. एवढेच नव्हेतर ते आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांची ही निस्वार्थ सेवा भाऊसाहेबांसाठी आयुष्यभराची माया ठरली.
आणि अखेर… भाऊसाहेब एका छोट्याशा अपघातात जखमी झाले. बराच काळ सोसलेल्या दुःखातून, आयुष्यभराच्या यातनांतून ते आता मुक्त झाले.
आज भाऊसाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांचं जगणं आणि त्यांची कहाणी समाजाला एक विचार करून जाते, त्याच बरोबर परमेश्वराने अन्याय केला, तरी माणसाने माणसासाठी काय करावं याचं उत्तम उदाहरण लक्ष्मीकांत उर्फ पिंटू नवनाथ झिंजाडे. यांच्या सेवेतून दिसून येतं. भाऊसाहेब ज्ञानदेव झिंजाडे यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना.