अखेर त्या ‘आजी’ची आत्महत्या…

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : गेल्याच आठवड्यात म्हणजे १७ नोव्हेंबरला ज्या आजीच्या दुःखावर प्रकाश टाकला आणि मदतीची हाक दिली, खरंतर मदत पोहचण्याआधीच या आजीने जग सोडण्याचा निर्णय घेतला आणि करमाळा शहरातील सातनळाच्या विहिरीवर आज (ता. २४) तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. काल जिचं दुःख लिहिलं तिनेच दु:खाचा निरोप घेतला. रोजच्या भुकेचा, वेदनेचा आणि एकटेपणाचा प्रवास सातविहिरीत उडी टाकून कायमचा संपवला. खरंतर ती हरली की आपण हरलो ? हा मोठा प्रश्न आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार बी. एस. वाडगे हे करत आहेत. त्यांनी या महिलेचे नाव खासाबाई देवराव गळगाठे (वय – ८०, रा. मांगी, ता. करमाळा) असे सांगितले असून तिला एक मुलगा असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. मांगीवरून दररोज चार किलोमीटरचा प्रवास करमाळ्यात खायला मिळते या आशेवर ही आजी दररोज यायला चार तास आणि जायला चार तास असा प्रवास करत होती. या घटनेने हा प्रवास कायमचा बंद झाला आहे.
आजीचा मागच्या आठवड्यात घेतलेला व्हिडिओ: https://youtube.com/shorts/WZRMPcvE6P4?si=CV9bJA89tlxX9iiX




