करमाळा : गेले अनेक महिने अत्यंत खराब अवस्थेत पोहोचलेल्या करमाळा–जामखेड रस्त्याचे करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने या भागातील नागरिकांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करमाळा-जामखेड या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. दीर्घकाळ दुरुस्ती न झाल्याने तसेच मागील पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था आणखी खराब झाली होती. या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनांसह मध्यम व अवजड वाहने, वाळू वाहतूक करणारे ट्रक, उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, एसटी बसेस व पिकअप वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून प्रवास अत्यंत धोकादायक झाला होता. या मार्गावरून जाताना अनेक लहान-मोठे अपघात घडत होते.
या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावरून रस्त्याची छायाचित्रे व व्हिडिओ प्रसारित करून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विविध प्रसारमाध्यमांतून या दुरवस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती.
अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने कालपासून करमाळा–जामखेड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. खड्डे बुजवून तातडीची डागडुजी करण्यात येत आहे. याबाबत विभागाचे अधिकारी पवार यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. विविध निवडणुका व आचारसंहितेमुळे निधी मिळण्यास विलंब झाला. आता निधी उपलब्ध झाल्याने ठेकेदार नेमण्यात आला असून महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील करमाळा-जामखेड रस्त्याची आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे.
“या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी उघडी पडून मोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार, चारचाकी व एसटी बसचे नुकसान होत होते, तसेच उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होण्याचा धोका निर्माण झाला होता. प्रवासाचा वेळही दुपटीने वाढला होता.
आम्ही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार याबाबत तक्रारी केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी पोथरेजवळील जाधव-भांड वस्ती परिसरात खड्ड्यांमुळे एका महिलेचा अपघात झाल्यानंतर आम्ही स्थानिक नागरिकांनी खासगी जेसीबीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुजी केली.
आता सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर दुरुस्ती सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे काम दर्जेदार व्हावे तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन डांबरीकरणासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे.”
–अंगद देवकते, करमाळा तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष,