पुणे बोर्डात इंग्रजी विषयात प्रथम – करमाळ्यातील नमिराचा बोर्डाकडून सन्मान

करमाळा (दि.१९ मे) : करमाळा येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समधील विद्यार्थिनी नमिरा इन्नुस फकीर हिने इ.१२ वीच्या २०२३-२४ वर्षातील बोर्ड परीक्षेत ‘इंग्रजी’ विषयात १०० पैकी ९५ गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिला पुणे विभागीय बोर्डाकडून डॉ. बापूजी साळुंखे पारितोषिक व श्रीमती सिताबाई काळे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या गौरवाची अधिकृत माहिती पुणे विभागीय बोर्डाने कॉलेजला पत्राद्वारे कळवली असून, पारितोषिकाची रक्कम असलेला धनादेश देखील पाठविण्यात आला आहे. इंग्रजी विषयात असा मान मिळवणारी नमिरा ही करमाळा तालुक्यातील आणि कॉलेजच्या इतिहासातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

तिला या यशासाठी इंग्रजी विषयाचे प्रा. दत्तात्रय भागडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप, प्राचार्य बी.के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक रमेश भोसले, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विजय पवार तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

कु. नमिरा हिने फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ९२.१७% गुण मिळवत संपूर्ण करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तिच्या यशाने परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



