शेलगाव (क) येथील तन्मय काटुळे कर सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम

करमाळा(दि.१३) : शेलगाव क (ता. करमाळा) येथील तन्मय तानाजी काटुळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट) परीक्षेत ३०२ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून त्याची ही निवड झाली आहे.
तन्मय काटुळे याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण करमाळा येथील नगरपरिषद शाळेत, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे कर्जत येथील श्री अमरनाथ विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय झाले. त्यानंतर त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी येथे एग्रीकल्चरल इंजीनियरिंग (Agril.Engg) ही पदवी प्राप्त केली.
या यशामध्ये आई, वडील यांच्यासह मित्र परिवार व नातेवाईक , ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे तन्मय याने शेवटी बोलताना सांगितले. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.






