मराठा आरक्षणासाठी १२ ऑगस्टला कुंभेज फाटा येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

करमाळा(दि. ८)– मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कुंभेज फाटा येथे मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने हे आंदोलन होणार असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव तसेच करमाळा पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे. आंदोलनात समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या निवेदनावर सचिन काळे, आनंदकुमार देवा ढेरे, दत्तात्रेय गव्हाणे, राजाभाऊ कदम, जमिर सय्यद, रोहित सोरटे, प्रमोदराव बदे, तेजेस ढेरे, दिलीप ढेरे, सचिन सिरसागर, दादासाहेब तनपुरे, सुनील कांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या असून, उपस्थित बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


