करमाळा नगरपरिषद निवडणूक : 113 वर्षांत पहिल्यांदाच ‘पंजा’ हद्दपार.! -

करमाळा नगरपरिषद निवडणूक : 113 वर्षांत पहिल्यांदाच ‘पंजा’ हद्दपार.!

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
(करमाळा, ता.29): करमाळा नगरपरिषदेला 158 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहास आहे. या पालिकेची पहीली निवडणूक 1912 साली झाली. त्यानंतर 113 वर्षात चार वेळा नगराध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे, मागील तीनही निवडणुकांमध्ये ‘हाताचा पंजा’ या चिन्हावरचे उमेदवारच विजयी झाले होते. मात्र, यंदाच्या 2025 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच ‘पंजा’ पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र दिसत असून, पंजाच्या परंपरेला तडा गेला आहे.


करमाळा नगरपरिषदेत सन 1974 साली पहिली निवडणूक जनमतातून झाली. त्यावेळी कै. गिरधररस देवी हे नागरी संघटनेकडून हाताचा पंजा चिन्ह घेऊन उभे होते. त्यावेळी जगताप गटाच्या जनसेवा आघाडीकडून कै.अण्णासाहेब जगताप हे कोंबडा चिन्ह घेऊन उभे होते.या दोन दिग्गजांची थेट टक्कर झाली.यात देवी यांनी 260 मतांनी विजय मिळवत ‘पंजा’चा पहिला झेंडा फडकावला.


त्यानंतर सन 2001 मध्ये तब्बल 26 वर्षांनी पुन्हा दुसऱ्यांदा जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात आले. त्यावेळी जगताप गटाकडून सुनीता वाशींबेकर काँग्रेस – पंजा या चिन्हावर उभ्या होत्या. त्यांच्या विरुद्ध नागरी संघटनेकडून कौशल्याकाकी परदेशी या मोटारगाडी चे चिन्ह घेऊन उभ्या होत्या. त्यावेळी सुनीता वाशिंबेकर या 742 मतांनी विजयी झाल्या.


त्यानंतर सन 2016 मध्ये तिसऱ्यांदा जनमतातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार वैभवराजे जगताप हे पंजा चिन्ह घेऊन उभे होते तर शहर विकास आघाडीचे कन्हैयालाल देवी हे शिट्टी चिन्ह घेऊन उभे होते. यात वैभवराजे जगताप यांनी 789 मतांनी विजय मिळवत ‘पंजा’ची हॅटट्रिक केली.

सन 2025 च्या यंदाच्या चौथ्या निवडणुकीत मात्र परिस्थिती पूर्ण बदलली काँग्रेसचा एकही उमेदवार रिंगणात नाही. करमाळ्याच्या जनमतातील तीन दशकांची ‘पंजा परंपरा’ यंदा मोडीत निघाली असून, ही ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे. यावेळी धनुष्यबाण – छत्री – कमळ – कप – बशी अशी पक्षाची चिन्हे आहेत. अशा विविध चिन्हांमध्ये होत आहे. पण यामध्ये ‘पंजा’ हा पारंपरिक विजेता मात्र पहिल्यांदाच अनुपस्थित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!