केम येथे जबरी चोरी – ९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथे रविवारी (दि. ७ एप्रिल) रात्री एक ते दोन च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी माळी गल्ली येथील प्रभाकर मारुती शिंदे यांच्या घरचा दरवाजा कटवणीच्या साह्याने उचकटून घरामध्ये प्रवेश करून ९ लाख,८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत प्रभाकर मारुती शिंदे (वय ६१) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सात एप्रिल रविवारी रात्री दहाच्या सुमारास मी तसेच घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेलो होतो. मी घराचे हॉलमध्ये झोपलेलो होतो त्यावेळी हॉल शेजारी असलेल्या बेडरूमला बाहेरून कडी लावून बंद केले होते व बेडरूम मधील लोखंडी कपाट लॉक केले होते तसेच बेडरूम शेजारील कुंकू कारखान्याचे ऑफिसला कुलूप लावलेले होते. माझा भाऊ गोपीनाथ शिंदे हे कुंकू कारखान्यात मुक्कामाला गेले होते. आमचे घर दोन मजली असून घरातील इतर लोक दुसऱ्या मजल्यावर झोपले होते रात्री सव्वा दोन च्या सुमारास मी लघुशंकेसाठी उठलो होतो. त्यावेळेस मी हॉलच्या बाहेर येऊन पाहिले पाहिले असता मी झोपलेल्या हॉलच्या बाजूला असलेला बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला मी आत जाऊन पाहिले असता बेडरूम मधील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व इतर साहित्य असते व्यस्त पडलेले दिसले तसेच कुंकू कारखान्याच्या ऑफिसचा दरवाजाचे लॉक तोडलेले दिसले. त्यावेळी मी घरातील लोकांना झोपेतून उठवले तसेच माझा भाऊ गोपीनाथ यांना ही कल्पना फोनवरून दिली ते कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम पाहिले असता ती मिळू शकली नाही. त्यावेळेस आपली चोरी झाली हे लक्षात आले. चोरी झालेल्या गोष्टींचा तपशील पुढील प्रमाणे :
- चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडया अंदाजे किंमत २ लाख २० हजार रुपये
- ३.८ तोळे वजनाच्या सोन्याच्या धातूचे गंठण अंदाजे किंमत २ लाख रुपये
- २ तोळे वजनाच्या सोन्याच्या धातूचे मिनी गंठण अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये
- साडे चार लाख रुपये रोख रक्कम
असा एकूण नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अशी फिर्याद दिली आहे करमाळा पोलीसानी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.
या आधी देखील केम मध्ये अशा जबरी चोऱ्या झालेल्या आहेत परंतु अद्याप पर्यंत एकाही चोरीचा तपास लागला नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास लावावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.