केम भागातील ठसे देखील बिबट्याचेच असल्याचे वनविभागाने केले जाहीर – दोन दिवस सतर्क राहण्याचे आवाहन
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा दावा केम परिसरातील नागरिकांनी केल्यानंतर आज (दि.१३) केम येथे वन विभागाच्या पथकाने पाहणी केली. संबंधित ठश्यांची पाहणी केल्यानंतर मोहोळ वन विभागाचे अधिकारी एस.आर.कुरुल यांनी संबंधित ठसे हे बिबट्याचेच असल्याचे जाहीर केले. हा एकच बिबट्या असून आता त्याचा प्रवास माढा तालुक्यात सुरू आहे तरी देखील केम व परिसरातील नागरिकांनी दोन दिवस सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काल (दि.१२) केममधील बेंद भागात भीमा सेना बोगद्याजवळ रात्री आठच्या सुमारास सोनू बळीराम तळेकर यांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिल्याचा दावा केला होता तसेच दोन दिवसांपूर्वी केम येथील शेतकरी हनुमंत तळेकर यांची शेळीदेखील अज्ञात प्राण्याने खाल्ली होती. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचा दावा या भागातील नागरिकांनी केला होता. केम मधील अच्युत पाटील यांनी करमाळा वनविभागाचे अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्याकडे संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती. त्यानुसार मोहोळ वनविभागाचे पथकाने आज केमला भेट दिली व संशयास्पद भागातील परिसराची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर संबंधित ठसे हे बिबट्याचेच असल्याचे जाहीर केले.त्यामुळे केम परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या केम भागात सोशल मिडीयावर वाघ भिंतीवरून चालून डरकाळया फोडत आहे अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व तो बेंद भागातील आहे असे टाकले आहे, तरी हा व्हिडिओ येथील नसून हा व्हिडिओ बाहेरचा आहे. यावर या परिसरातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नये हि अफवा आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ए.पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील यांनी केले आहे.