जेऊर ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयीबाबत माजी सभापती सुनिता निमगिरे यांचा धरणे आंदोलनाचा इशारा

करमाळा (दि.२२) : करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय केवळ काही तासच सेवा सुरू असून पूर्णवेळ उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता निमगिरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत तातडीने सुधारणा न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निमगिरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, ग्रामीण रुग्णालय जेऊर येथे पूर्णवेळ डॉक्टर, नर्सेस, शिपाई, सुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट आदी कर्मचारी कार्यरत असतानाही दवाखाना केवळ सकाळीच उघडला जातो. दुपारी व रात्री आपत्कालीन रुग्णांनाही सेवा नाकारली जाते.

विशेष म्हणजे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असूनही डिलिव्हरी व सिझेरियन शस्त्रक्रिया रुग्णालयात होत नाहीत. यामुळे अनेक वेळा गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. काल रात्री पोटदुखीचा त्रास असलेल्या एका रुग्णाला घेऊन गेलेल्या निमगिरे यांना देखील रुग्णालयात केवळ एक शिपाई मिळाला आणि त्याने दवाखाना बंद असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा व पीएम रूम असूनही रुग्णांना दुसरीकडे पाठवले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
“जर ग्रामीण रुग्णालय जेऊर येथे सर्व आवश्यक सेवा तात्काळ सुरू केल्या गेल्या नाहीत, तर रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा निमगिरे यांनी दिला आहे.




