राज्यपातळीवर 'भाजपा'सोबत तर तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांचेसोबत काम करणार - माजी आमदार जयवंतराव जगताप - Saptahik Sandesh

राज्यपातळीवर ‘भाजपा’सोबत तर तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांचेसोबत काम करणार – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्याच्या राजकारणात जगताप घराण्याचे योगदान मोठे आहे. स्वतंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात जगताप घराण्याचे काम आहे. स्वातंत्र्यसैनिक म्हणून थोरले साहेब कै. नामदेवराव जगताप यांनी कारावास भोगलेला आहे. त्यानंतर विकासकामामध्ये देशभक्त नामदेवराव जगताप यांच्यानंतर मी स्वत: सातत्याने कार्यरत आहे. सत्तेच्या राजकारणात अलिकडे ताटलीबाटलीचे प्रस्थ वाढले आहे. त्यानुसार आपण राज्याच्या राजकारणात भाजपा सोबत तर तालुक्याच्या राजकारणात विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या सोबत राहणार आहोत; असे मत जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले.

१२ डिसेंबरला श्री.जगताप यांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने ‘साप्ताहिक कमलाभवानी संदेश’ला दिलेल्या मुलाखतीत ते परखडपणे बोलले. पूर्वीचे दिवस बदलले आहेत. वास्तविक पाहता पूर्वीच्या दिवसाची आज गरज आहे. एकत्र कुटूंब पध्दती, राजकारणात तत्वनिष्ठता माणसामध्ये माणुसकी या गोष्टीची गरज आहे. अलिकडे काही लोकांनी शेणखाऊ पध्दती सुरू केली आहे.

त्यामुळे समाजातील चित्र बदलले आहे. ताटली – बाटली देणाऱ्यांना मतदान मिळत असेलतर सेवा करणाऱ्यांचे काय ? केवळ पैसा नाही म्हणून विकासकाम करणाऱ्या माणसाला डावलले जात असेलतर आता राजकर्त्या मंडळींनी बदलले पाहिजे. स्वार्थी प्रवृत्तीच्या राजकारणाने शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे मिळेनात, शेताला मजूर मिळत नाही. युवकांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याला वीज नाही आणि प्यायला स्वच्छ पाणी नाही. सध्याच्या स्थितीत ऊसतोड कामगार व वाहनमालकाचे जे हाल होत आहेत त्याला भ्रष्ट राजकारणी जबाबदार आहेत.

त्यामुळे तालुक्यातील जनता बदलत नाही तोपर्यंत अशा चुकीच्या गोष्टी घडत राहणार आहेत. या सर्व गोष्टी बदलासाठी आपण आ. संजयमामा शिंदे यांचे सोबत काम करत आहोत व यापुढेही करत राहू. यावर्षी दुष्काळी स्थिती आहे. जानेवारी नंतर पाण्यासाठी फार संघर्ष करावा लागणार आहे. अन्न आणि पाणी या दोन गोष्टी सर्वसामान्यां पर्यंत सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत. या करीता आपण योग्य ते धोरण आखून सर्वसामान्यांची जेवढी सेवा करता येथील तेवढी करणार; असेही जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!