करमाळा तालुक्यातील विविध कामांसाठी माजी आमदार नारायण पाटलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील रस्ते, वीज बिल व जलवाहतूक हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आपण निवेदन सादर केल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, करमाळा मतदार संघातील काही विकासकामे रखडलेली असल्याने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना भेटून प्रत्यक्षात सदर कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे विनंती आपण केली आहे.
यामध्ये करमाळा तालुक्यातील निधी मंजूर असलेल्या कामांवरील स्थगिती उठवावी अशी मागणी आहे. रस्ते दुरुस्तीची ही कामे असुन रा. मा क्रं 9 ते प्रजिमा क्रं 4 (कोंढेज-निंभोरे रस्ता) या कामासाठी 3 कोटी 33 लाख रुपये मंजूर आहेत. तसेच मिरगव्हाण-अर्जूननगर- सौंदे-वरकटणे-कोंढेज (प्रजिमा क्र 8) यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर आहेत.तर प्रजिमा क्र 6 मधील 0/00 ते 2/500 व 23/100 ते 27/500 या कामासाठी 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर आहेत. प्रजिमा 124 मधील 10/00 ते 15/100 मध्ये दुरुस्ती साठी सुमारे 2 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजुर आहे. परंतू या कामांवर स्थगिती असल्याने हि कामे बंद आहेत. तरी या कामावरील स्थगिती उठवली जावी अशी मागणी आपण केली आहे. तसेच कोरोना कालावधी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेतीसाठी वीज महत्त्वाची असून महावितरण कडून दर वर्षी आडकाठी करुन वीज बिल वसुल केले जाते. तरी मागील संपूर्ण थकीत वीज बिल माफ केले जावे अशी मागणी आपण केली आहे. तसेच उजनी जलाशय हा पुणे व सोलापूर जिल्ह्यात असल्याने जलवाहतूक सेवा सुरू करुन हे दोन जिल्हे जलमार्गाने जोडले जावेत ही आपली पुर्वीची मागणी असून याकामाबाबत प्रत्यक्षात सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी आपण केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.