माजी आमदार शिंदे यांच्याकडून डिकसळ पुलाच्या कामाची पाहणी

करमाळा(दि.२४): डिकसळ-कोंढार चिंचोली मार्गावरील नवीन पुलाच्या काम सुरू असून या कामाची पाहणी माजी आमदार मा. संजयमामा शिंदे यांनी नुकतीच केली. यावेळी त्यांच्यासोबत बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, तसेच संबंधित ठेकेदारांचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना श्री शिंदे म्हणाले की, या पुलाचे काम करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी ठरला होता. विविध कारणांमुळे ३६ महिन्यांच्या कालावधीपैकी २० महिने आधीच संपले आहेत. कामाची प्रगती समाधानकारक नसली, तरीही या प्रकल्पाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सध्या मी सत्तेत नसलो तरीही अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून या कामास कुठलीही अडचण येणार नाही, याची खात्री आम्ही देतो.

करमाळा तालुक्यासह पुणे, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा अशी अनेक वर्षांची मागणी या भागातील नागरिकांची होती. तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पुलासाठी 55 कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली.





