करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - माजी सरपंच आशिष गायकवाड - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – माजी सरपंच आशिष गायकवाड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देवळालीचे माजी सरपंच व आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक आशिष गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना गायकवाड म्हणाले, की तालुक्यात यावर्षी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसाने गवत वाढण्यापलिकडे काही झाले नाही. पाऊस नसल्यामुळे उजनी धरण भरले नाही. याचा परिणाम म्हणून दहिगाव उपसासिंचन योजना चालू झाली नाही. त्यामुळे या योजनेवरील २० ते २५ गावातील केळी, ऊस, कांदा, मका व अन्य पिके जळून गेली आहेत. अशीच परिस्थिती तालुक्याच्या पोथरे, कोर्टी, रावगाव, साडे, सालसे व केम या भागात आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना खरीपाचा हंगामही घेता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणे कठीण झाले आहे. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पाणी टंचाईही जाणवू लागली आहे. शासनाने तालुक्यात पीक पाहणी दौरा करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सोयीसवलती तातडीने द्याव्यात अन्यथा करमाळा-टेंभूर्णी रस्त्यावर रास्ता रोको, उपोषण आदी मार्गाने आंदोलन करण्यात येईल; असाही इशारा आशिष गायकवाड यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेले उजनी धरण सध्या १४.३६ टक्के (२९ ऑगस्ट) भरलेले आहे. गेल्या वर्षी १३ ऑगस्ट पर्यंत उजनी धरण १००% भरलेले होते. उजनी धरणामध्ये ६३.६६ टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा असून त्याच्या वरती पाणी येऊ लागलं की उजनी धरण हे प्लस मध्ये येतं. काल (२९ ऑगस्ट) च्या माहितीनुसार उजनी मध्ये ७१.३५ टीएमसी पाणीसाठा असून ७.६९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

चारा डेपो किंवा छावणी शासनाने सुरू करावी पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. याचा परिणाम तालुक्यातील दूध उत्पादक व व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. साखर कारखानदाराने ऊसाची बिले दिली नसल्याने अगोदरच शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यात दुष्काळाची भर पडली आहे. शेतकऱ्यांना दूधाचा व्यवसाय हा जोडधंदा म्हणून मोठा आर्थिक आधार असतो. हा आर्थिक आधारच कोलमडला तर शेतकरी नेस्तनाबूत होईल. सध्या दुधाचे दर कमी होत असून पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध व्यवसायिक व दुध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पाण्याचे टँकर, चारा डेपो किंवा चारा छावणी शासनाने तातडीने सुरू करावी.

संदीप गायकवाड (चेअरमन, विश्वजीत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट देवळाली)
संदीप गायकवाड

संबधित बातमी – करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्हयावर दुष्काळाची छाया – पिकांसह, जनावरे जगविण्याचा शेतकऱ्यांपुढे प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!