खडकी येथील माजी सरपंच रामभाऊ शिंदे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. १ : खडकी (ता. करमाळा) येथील माजी सरपंच रामभाऊ श्रीरंग शिंदे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने खडकी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अतिशय कष्ट, संघर्ष व प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपल्या जीवनात प्रगती साधली. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी विकासकामांना प्राधान्य देत गावाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली खडकी ग्रामपंचायतीची कारकीर्द गाजली होती.
ते वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जोडलेले होते. सामाजिक, धार्मिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. साधी राहणी, स्पष्ट भूमिका व जनतेशी आपुलकीने वागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शेतकरी कुलदीप शिंदे व बँक कर्मचारी समाधान शिंदे यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनाने गावाने एक अनुभवी, कष्टाळू व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.




