माजी सैनिक सचिन पवार यांची एमपीएससीतून दोन पदांवर निवड..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोफळज (ता.करमाळा) येथील माजी सैनिक सचिन गुंडीबा पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करत एकाच वेळी कर सहाय्यक व लिपिक या दोन पदांवर निवड मिळवली आहे.

सचिन पवार यांनी सन 2002 मध्ये भारतीय सेनेत शिपाई पदावर सेवेत प्रवेश केला होता. त्यांनी तब्बल 22 वर्षे भारतीय सेनेत, एअर फोर्स विभागात सेवा बजावली असून ऑगस्ट 2024 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यासमोर खाजगी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत्या; मात्र त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात कर सहाय्यक व लिपिक या दोन्ही पदांसाठी यश मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना सचिन पवार म्हणाले, “आमच्या कंपनीचे कर्नल अर्जुन चितळे यांनी मला एमपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझ्या या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, मित्रमंडळी व कुटुंबीयांचे सहकार्य तसेच माझ्या अभ्यासासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पत्नीचे मोलाचे योगदान आहे.” माजी सैनिकाने नागरी सेवेत प्रवेश करत मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



