वांगी 3 च्या 'न्यू इंग्लिश स्कूल'चा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात.. - Saptahik Sandesh

वांगी 3 च्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’चा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नं. ३ (ता.करमाळा) या शाळेतील दहावी बॅच १९७९ ते २००७ दरम्यान च्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा दिनांक ०४ व ०५ जून रोजी दोन दिवस महाकाली आश्रम जेऊर येथे अतिशय मंगलमय आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

या मेळाव्यासाठी साधारणपणे ३० माजी विद्यार्थिनी, ५० माजी विद्यार्थी आणि १० तत्कालीन शिक्षक असे जवळपास ९० जण उपस्थित होते. हे माजी विद्यार्थी कोणी दिल्ली तर कोणी मुंबई तर कोणी पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यक्रम स्थळी मुक्कामी आले होते. हा स्नेह मेळावा या सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अतिशय अविस्मरणीय असा ठरला. कारण सगळेच जण तब्बल ३५ वर्षानंतर भेटत होते. त्यामुळे अनेकांना जुन्या आठवणींनी भावना अनावर झाल्या. तसेच दिवस भराच्या भरगच्च कार्यक्रमा नंतर सायंकाळी सर्वांनीच संगीत मैफिलीचा मनसोक्त आनंद घेतला.

५ तारखेला चिखलठाण येथे श्री कोटलिंग मंदिर येथे दर्शन घेऊन सर्वांनी उजनी मध्ये बोटिंगचा आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तब्बल ३५ वर्षानंतर होणाऱ्या या स्नेह मेळाव्याची सुरुवात ही कवी कुसुमाग्रजांच्या *कणा* या कवितेतील *ओळखलंत का सर मला...पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी* या ओळींनी झाली. या स्नेह मेळाव्यासाठी गुंड सर, जाधवर सर, लोंढे सर, कदम सर, तळेकर सर, खराडे सर, जगताप सर, लवटे सर तसेच चिवटे गुरुजी असे अनेक जुने शिक्षक आवर्जून उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला तसेच सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत ऋणानुबंध व्यक्त केले. तसेच फाटक सर, चव्हाण सर, जाधव सर, शिंदे सर इ. दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थी संतोष देशमुख यांना कार्यक्रमा दरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी यांनी आपला परिचय देत मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमोडे, सोमनाथ खराडे, संगीता रोकडे आणि अर्जुन तकिक यांनी केले. सदर स्नेह मेळावा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निर्मला सपकाळ, मगन गोडगे, शिवाजी जाधव, विकास वाघमोडे, सोमनाथ खराडे, संगीता फाटक, लक्ष्मण साळुंखे, संतोष जगताप, हनुमंत सोनवणे, संध्या गुजर, संगीता रोकडे, भुजंगराव जाधव, गोपाळ खराडे, अर्जुन तकिक, विजयकुमार तावसे, सोमनाथ सोनवणे इ. सर्वांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे आभार सोमनाथ खराडे यांनी मानले आणि शेवटी राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!