आईच्या प्रियकराचा खून करणाऱ्या दोघा मुलांना आणखी चार दिवसाची पोलीस कोठडी..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.७) : आईच्या प्रियकराचा खून करणाऱ्या संशयित आरोपी सुनील शांताराम घाडगे (वय-28) व राहुल शांताराम घाडगे (वय-30) या दोघा भावंडांना करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांचेसमोर हजर केले होते त्यांना आतापर्यंत ६ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती, आज पुन्हा त्यांना हजर करण्यात आले असता पोलीसांकडून ७ दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली असता यामध्ये त्यांना आणखी चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यात हकीकत अशी कि, ५ जूनला करमाळा-अहमदनगर रस्त्यावरील एमआयडीसीशेजारील कुकडी कॅनॉललगत आडरानात उभ्या असलेल्या स्विफ्ट कार मध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिकांना दिसला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह श्रावण रघुनाथ चव्हाण (वय-39)(रा.अडसुरेगाव, ता.येवला, जि.नाशिक या व्यक्तीचा असल्याचे समजले. यात मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले की, माझे भाऊ श्रावण चव्हाण याचे आरोपीच्या आईशी अनैतिक संबंध होते. याची चिड आरोपीना होती. त्यामुळे यातील आरोपी सुनील शांताराम घाडगे (वय-28) व राहुल शांताराम घाडगे (वय-30) दोघे रा.अंदरसुल, ता.येवला यांनी माझे भावास 3 जून ला अंदरसुल येथे सकाळी 9-30 वा.बोलावले. त्यानंतर या दोघासह एका महिलेने माझे भावास जीवे ठार मारून त्याचेच स्वीफ्ट कार मध्ये टाकून आणून गाडीसह जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
ही स्वीफ्ट कार क्रमांक एम.एच.15 सी.टी. 8006 करमाळा हाद्दीत 5 जून ला सापडली. याप्रकरणी करमाळा पोलीसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलीस प्रमुख अजित पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी तपासाबाबत नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, हावलदार अजित उबाळे यांना येवला येथे तपासाबाबत पाठवले तर स्थानिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे व प्रवीण साने यांचेकडे दिला. पोलीसांनी अत्यंत जलद तपास करुन खूनाचे कारण शोधले व आरोपीपर्यंत पोहचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी संशयित आरोपी सुनील शांताराम घाडगे (वय-28) व राहुल शांताराम घाडगे (वय-30) दोघे रा.अंदरसुल, ता.येवला यांना करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांचेसमोर हजर केले होते. पोलीसांकडून दहा दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती. सहाय्यक अभियोक्ता ॲड सचिन लुणावत यांनीही पोलीस कोठडीची अवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यानंतर न्यायाधीश भोसले यांनी 12 जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर या दोघा भावंडांना आज (ता.१२) करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांचेसमोर हजर केले असता पोलीसांकडून ७ दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती, यामध्ये त्यांना आणखी चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.