ऊसतोडीसाठी मजूर देतो म्हणून आठ लाख रूपयाची फसवणूक…

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : ऊसतोडीसाठी ११ कोयते म्हणजे २२ मजूर देतो असे म्हणून आठ लाख रूपये घेऊन मजुरही दिले नाही व पैसेही दिले नाहीत. अशा मुकादमाविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राजेंद्र ज्ञानदेव गव्हाणे (रा. पोफळज) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना घागरगाव (ता. इंदापूर) यांचेबरोबर ऊस वाहतुकीसाठी करार केला होता. त्यानुसार मला ११ कोयत्यांची गरज होती. हे कोयते मी तुम्हाला देतो.. असे ऊसतोड मुकादम भारत एकनाथ गायकवाड (मुळगाव आटवाडी एकलहरे, ता. श्रीरामपूर, ह.रा.चिखलठाण नं.१, ता. करमाळा) हा म्हणाला व त्यासाठी त्याने १ सप्टेंबर २०२२ रोजी आठ लाख रूपये उचल मागितली.
त्यास एक लाख रूपये फोन पे ने तर बाकीचे सात लाख रूपये रोख देऊन नोटरी केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने कोयतेही दिले नाही व रक्कमही दिली नाही. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



