जुगार खेळणाऱ्याला पकडले – 35 हजाराचा ऐवज जप्त – गुळसडी येथील प्रकार..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.22 : गुळसडी (ता.करमाळा) येथे जुगार खेळणार्याना पाच जणांना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांचे कडून 35 हजार रूपये चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल सोमनाथ महादेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी व माझे सहकारी 16 मार्च ला काम करत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, मौजे गुळसडी येथील सरकारी दवाखान्याचे पाठीमागे कांही इसम गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत. त्यानंतर मी, पो.ना.ण ढवळे, पो.कॉ. जगताप असे तिथे गेलो असता तेथे एक मोटारसायकल व कांही इसम गोलाकार बसून जुगार खेळत असताना दिसले.
आम्ही त्यांना सव्वा पाच वाजता गराडा घालून जागीच पकडले.सदर ठिकाणी जुगाराचे साहित्य 52 पत्याचा डाव व 500 रू रोख रक्कम जमिनीवर पडलेले दिसले. तिथे शब्बीर चाँद शेख याचे ताब्यात 400 रू रोख रक्कम व 1000/- रू किंमतीचा जिओ कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल सापडला, शिवाजी रामा भोसले याचे कडे 350 रू रोख रक्कम व व 1000/- रू किंमतीचा एक जिओ कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल, संभाजी अर्जुन चव्हाण याचेकडे 550 रू रोख रक्कम व त्यांचे ताब्यातील 25,000/- रू. किमंतीची एक बजाज कॅलीबर कंपनीची मोटारसायकल त्याचा नंबर एम.एच. 14 एस 3379,महेश हणुमंत ढावरे याचे अंगझडतीत 600 रू रोख रक्कम व 5000/- रू किं.चा एक रेडमी कंपनीचा जांभळे रंगाचा मोबाईल तर बाबु बबन शेख याचेकडे 550 रू रोख रक्कम व 1000/- रू किंमतीचा एक जिओ कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल सापडला.हे सर्व गुळसडी येथील रहिवासी आहेत. त्यांचेकडे एकूण 35, 450/- रू किंमतीचा मुददेमाल व 52 पत्त्याचा डाव व जुगाराचे साहित्य मिळून आले. ती जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.