विद्यार्थ्यांनी साकारल्या विविध वेशभूषा – सालसेतील शास्त्री विद्यालयाचे गणेश विसर्जन उत्साहात

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील सालसे येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ४ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांमधून भारतीय सांस्कृतिक विविधतेचे अप्रतिम दर्शन घडवले.
गावातून निघालेल्या या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा, पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, अधिकारी, व्यवसायिक, शेतकरी व पत्रकार यांची भूमिका साकारली. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे भरभरून कौतुक केले.
मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे मावळे आणि मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पोशाख परिधान केलेला विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इयत्ता सहावीतील जयप्रकाश गुंड याने मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटलांची वेशभूषा जिवंतपणे साकारली. नागरिकांनी या प्रसंगी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत उत्साह अधिकच वाढवला.
विशेष म्हणजे, अनेक तरुणांनी छोट्या जरांगे पाटलांसोबत सेल्फी घेतल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. मिरवणुकीचे आयोजन मुख्याध्यापिका तनपुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बगाडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून यशस्वी झाले. न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सपकाळ व सचिव रवींद्र सपकाळ यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.