वांगी क्र.२ च्या सरपंचपदी गणेश जाधव यांची बिनविरोध निवड

करमाळा (दि. १५): करमाळा तालुक्यातील वांगी क्र.२ येथे १५ जुलैला सरपंच निवडीची बैठक झाली. या बैठकीत वांगी क्र. २ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

गणेश जाधव यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली असून, त्यातूनच ते सरपंचपदापर्यंत पोहोचले आहेत. वांगी ग्रामपंचायतीच्या विभाजनासाठी त्यांनी गावाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हावे या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले. गावात विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, कोरोना काळात गरजूंना मदत करून त्यांनी समाजात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना गावकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाला आहे.
त्यांच्या निवडीनंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
“मला मिळालेले सरपंचपद ही केवळ एक जबाबदारी नाही, तर गावाच्या विकासासाठी मिळालेली संधी आहे, असे मी मानतो. सर्व घटकांचे मत ऐकून पारदर्शक, विकासाभिमुख आणि जनहिताचे निर्णय घेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. स्वच्छता, पाणी, रस्ते, शिक्षण आणि रोजगार यावर विशेष भर देऊन सर्वांचा विश्वास मिळवण्याचा मी प्रयत्न करीन.”
– गणेश जाधव, नूतन सरपंच, वांगी क्र. 2, ता. करमाळा


आज त्यांच्या सरपंचपदाच्या निवडीने ग्रामस्थांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. एक दूरदृष्टी असलेला, सर्वसामान्यांची जाण असणारा, वैचारिकदृष्ट्या पुरोगामी असा नेता गावाच्या हक्काच्या विकासासाठी पुढे आला आहे याचा प्रत्येक वांगीकरास अभिमान वाटत आहे.



