करमाळा शहर सीसीटिव्ही कॅमेरायुक्त होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – समीर शेख
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात चोरी, घरफोडी सारख्या गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी व भविष्यात कोणताही मोठा अनुचीत प्रकार घडू नये व त्याची खबरदारी म्हणून करमाळा शहरात सीसीटीवी कॅमेरा बसविणे गरजेचे आहे, यासाठी करमाळा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, त्यासाठी मंडळानी सीसीटीवी कॅमेरा बसविणेकामी पुढाकार घ्यावा असे आवाहन ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे मार्गदर्शक समीर शेख यांनी केले आहे.
याबाबतीत पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, गणेशोत्सव मंडळाच्या खर्चातून 10 टक्के खर्च बाजूला काढला तरी आपापल्या भागातील परिसर हा सीसीटीवी कॅमेरा युक्त होईल. यासाठी सर्वच मंडळांनी पुढाकार घेऊन केलेच पाहिजे. करमाळा शहरात या आधी सीसीटीवी कॅमेरा बसवण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
हाजी हाशमोद्दिन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरात सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा बस स्थानक परिसरात सीसीटीवि कॅमेरे बसविले आहे.
तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन या संस्थेने पण शहरातील राम मंदीर येथे व मोहल्ला गल्ली परीसरात सीसीटीवी कॅमेरा बसविले आहे. तसेच वेताळ पेठ येथील जामा मस्जिद व मोहल्ला गल्लीतील माॅं आयशा मस्जिद येथे सुद्धा कॅमेरे बसविण्यात आले आहेत, या संस्थांचा आदर्श घेऊन करमाळा शहरातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळांने आपला परिसर हा सीसीटीवी कॅमेरा च्या छायेत आणण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. असेही समीर शेख यांनी म्हटले आहे.