घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत केम येथील गौरीने बारावीत मिळविले यश
केम (संजय जाधव) – आपल्या घरच्या असलेल्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता व कोणताही खाजगी कोचिंग क्लास न लावता केम येथील गौरी रमेश तळेकर हिने बारावी (विज्ञान) परिक्षेत ८६ टक्के गुण मिळविले आहेत.
गौरीचे आईवडील मोलमजुरी करून आपला संसार चालवत आहेत. वडिल ह.भ.प. रमेश तळेकर हे गिरण्यांच्या पाळी ठोकण्याचे काम करतात तर गौरीची आई मजुरीकाम करून संसाराला हातभार लावतात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात मुलीना शिकू देणे हीच मोठी गोष्ट असते. अशात गौरीच्या पालकांनी तिच्या शिक्षणाला खंबीरपणे पाठिंबा दिला. गौरीला इतर चांगल्या आर्थिक परिस्थिती असलेल्या पाल्यांच्या मुला मुलींप्रमाणे शैक्षणिक वा इतर सुविधा उपलब्ध नसल्या तरी तिने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्दीने बारावीत हे यश संपादन केले आहे.
गौरी ही केम येथील नुतन माध्य व उच्च माध्य विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तिला या शाळेतील शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. तिने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर,श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंत गिरी महाराज,गोरख नाना तळेकर,राहुल कोरे, ह.भ.प.थिटे महाराज, माजी उपसरपंच नागनाथ तळेकर, ह.भ.प.मच्छिंद्र तळेकर, आवीनाश तळेकर, पत्रकार संजय जाधव,उत्तरेश्वर टोणपे, ह.भ.प. नारायण टोणपे उत्तरेश्वर मारूती तळेकर यांनी अभिनंदन केले.