स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेऊरवाडीत रोपे भेट
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जेऊरवाडी गावात उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत जेऊरवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण माजी सैनिक सोमनाथ शिरसकर संजय हारगे व भारतीय सैनिक हनुमंत मुटेकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली.
या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त एक रोप भेट देण्याचा उपक्रम माजी सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी वर्षभर यशस्वीरित्या राबवला. उन्हाळी सुट्टीत ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने गुलाबाचे रोप देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून गावात वृक्षारोपणाची व वृक्ष संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शिरसकर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास वही पेन भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ध्वजारोहणास सरपंच मायाताई निमगिरे सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे यांनी मानले.