विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र झाल्यास ५ हजार रु तर व नवोदय परीक्षेत पात्र ठरला तर शिक्षकांना २१ हजार रुपये बक्षीस - Saptahik Sandesh

विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र झाल्यास ५ हजार रु तर व नवोदय परीक्षेत पात्र ठरला तर शिक्षकांना २१ हजार रुपये बक्षीस

करमाळा (दि.११) :  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा घोटी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन पर बक्षीस देण्याचे जाहीर केलेले आहे. दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांकडून मिळावे हा या मागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घोटी शाळेतील जेवढे विदयार्थी राज्य/जिल्हा/तालुका गुणवत्ता यादीमध्ये पात्र होतील त्यानुसार गुणवत्ताधारक प्रति विदयार्थी ५०००/- रु. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मेडल देऊन त्या मार्गदर्शक शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ घोटी याचे वतीने सन्मान करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच इयत्ता सहावीसाठी केंद्रीय जवाहर नवोदय विदयालयास प्रवेश पात्र ठरलेल्या मार्गदर्शक शिक्षक यांचा प्रति विदयार्थी २१०००/- रु. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मेडल देऊन या योजनेअंतर्गत सन्मान करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. गुणवत्ता धारक विदयार्थी यांनाही प्रोत्साहन योजनेअंतर्गंत अनुक्रमे शिष्यवृत्तीसाठी परीक्षेसाठी ५०००/- रु. रोख व नवोदय प्रवेश परीक्षेस पात्र झालेल्या विदयार्थी यांना रोख २१०००/- रू. तसेच सन्मानचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातून दर्जेदार व गुणवत्तापुर्ण अधिकारी तयार होणेकामी प्राथमिक स्तरावरून स्पर्धा परीक्षांची ओळख व तयारी करून देणेचे उद्देश समोर ठेवून शाळाव्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा घोटी व सर्व ग्रामस्थ घोटी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजना सन-२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी येथे राबविण्याचे एकमताने ठरविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!