“करमाळ्याचा चेहरा बदलायचा असेल तर भाजपाला सत्ता द्या” — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आवाहन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरातील दयनीय पायाभूत सुविधा, रस्त्यांची वाईट अवस्था, पाण्याची टंचाई आणि बंदिस्त गटारांच्या अभावावर थेट भाष्य करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले. सुभाष चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.गोरे म्हणाले की, “करमाळ्यात ना रस्ते, ना पाणी, ना गटारे… अशा स्थितीत याला शहर म्हणावं तरी कसं?” रस्त्यांवरील खोल खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे विकार वाढत असून, डॉक्टरांचा व्यवसायच जणू भरभराटीला आल्याची टोलेबाजी त्यांनी केली. ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांनाच बिनधास्त मत मागण्याचा अधिकार नाही, नागरिकांनी त्यांना दारातही उभं करू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

उजनी जलाशय जवळ असूनही करमाळा पाण्यासाठी तडफडतोय, याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आश्वासन दिले की, “भाजप सत्ता मिळाल्यास दोन महिन्यांत करमाळ्याचा चेहरा बदलून दाखवू; रस्ते, पाणी, गटारे यांसाठी कोट्यवधींचा निधी आणू.”

व्यासपीठावर रश्मी बागल, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता देवी, गणेश चिवटे, सूर्यकांत पाटील, जितेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेत दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, किरण बोकन, सौरभ शिंगाडे, सुहास घोलप, सुनिता देवी आदींनी भाषण केले.

करमाळा नगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरे यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि शहर विकास आघाडीसाठी नवे राजकीय आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नितीन चोपडे यांनी केले तर
सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले. याप्रसंगी यशपाल कांबळे यांचा सत्कार व त्यांचा पाठिंबाही जाहिर करण्यात आला.
