सरसकट हेक्टरी १ लाख रू नुकसान भरपाई द्या – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

केम (संजय जाधव): “पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत बसू नका आणि ओल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा करून सरसकट हेक्टरमागे एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या,” अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले.

या निवेदनावर माजी उपसरपंच विजय माने, अॅड. विकास जरांडे, उत्तम हनपूडे, शिवसेना शाखाप्रमुख भाऊ मस्तूद, बालाजी वाडेकर, शिवाजी नाईकनरे, शिवाजी लोंढे, अविनाश गाडे, बाळासाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांदा, फळभाज्या, केळी, डाळिंब, पेरू, भुईमुग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे आणि छप्परे उडून नुकसान झाले आहे.

दुभत्या जनावरांसाठी साठवलेला ओला चारा देखील सततच्या पावसामुळे खराब झाला असून, चार्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागती सुरू केल्या होत्या, मात्र सततच्या पावसामुळे शेतजमीन चिखलमय झाली आहे. त्यामुळे लव्हाळा आणि इतर गवत वाढण्याची शक्यता असून, ही जमीन पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी अतिरिक्त मशागत करावी लागणार आहे. याचवेळी मान्सूनचं आगमनही सुरू झाल्यामुळे लवकर वाफसा होण्याची शक्यता कमी आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर तालुक्यात “ओल्या दुष्काळसदृश्य” परिस्थिती निर्माण झाली असून, नुकसान न झालेला एकही शेतकरी उरलेला नाही. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न दवडता तात्काळ मदत जाहीर करावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.


