कंदरमध्ये जागतिक बँक सल्लागारांची भेट : केळी निर्यात केंद्र व आधुनिक शेती पद्धतीचे कौतुक

कंदर (संदीप कांबळे) : जागतिक बँकेच्या साहाय्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पाला अधिकारी भेट देत असतात. 
याच पार्श्वभूमीवर कंदर (ता.करमाळा) येथील केळी निर्यात केंद्र तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला जागतिक बँकेच्या सल्लागार व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली.

या टीमचे नेतृत्व युनायटेड किंगडम येथील जागतिक बँकेच्या सल्लागार लुसी म्याथूसन यांनी केले. त्यांनी किरण डोके यांच्या केळी निर्यात केंद्रात जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, कार्यपद्धती, छाननी, ग्रेडिंग, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक प्रक्रियेची माहिती घेतली. निर्यात मानकांच्या आधारे केंद्राचे काम पाहून समाधान व्यक्त केले.

यानंतर टीमने संदीप रमेश पराडे यांच्या शेताला भेट देऊन तेथे अंमलात आणलेल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची पाहणी केली. पराडे कुटुंबीयांनी केलेल्या नियोजनबद्ध शेतीमुळे केळी, डाळिंब, आले यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून सर्व पिके निर्यातक्षम असल्याचे सल्लागारांना सांगण्यात आले. सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करून उत्पादनक्षमता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्नही यावेळी अधोरेखित झाला.


जागतिक बँक सल्लागार व अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पुढील काळात पायाभूत सुविधा उभारून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. या भेटीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले (सोलापूर), रवींद्र माने (नाशिक), अनिल गवळी (धोरण विश्लेषक, स्मार्ट प्रकल्प), प्रदीप लाटे (संचालक आत्मा, अहमदनगर), वैभव शिंदे (प्रकल्प व्यवस्थापक), उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तसेच निर्यातदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प काय आहे?
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारकडून जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीला व्यवसायाशी जोडणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) बळकट करणे, शेतीमाल प्रक्रिया, साठवण व थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिला स्वयंसहायता गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ शेती पद्धती विकसित करणे आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून मूल्यसाखळी मजबूत करणे यावर भर दिला जातो. राज्यातील हजारो गावे या प्रकल्पाच्या लाभात येत असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे.


 
                       
                      