“स्व. सुखदेव साखरे यांच्या कार्याचा गौरव – नवीन पुरस्काराची घोषणा”

करमाळा : श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी (ता. करमाळा) चे पहिले मुख्याध्यापक, स्व. सुखदेव साखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एक प्रेरणादायी पाऊल उचलले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका उपक्रमशील मुख्याध्यापकाला ‘स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती या विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी दिली.
स्व. साखरे सरांनी कठीण काळात श्री. राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून धुरा सांभाळली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दीप उजळवला. सर्व अभावांवर मात करत राजुरी गावात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे.
हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार रुपयांची रक्कम अशा स्वरूपात दिला जाईल. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही अर्ज मागविण्यात येणार नाहीत, तर पुरस्कार संयोजन समिती स्वतः अशा मुख्याध्यापकांचा शोध घेणार आहे. दरवर्षी स्व. साखरे सरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. शिक्षकत्वाच्या उज्ज्वल आदर्शाला अभिवादन करणारा हा उपक्रम निश्चित प्रेरणादायी आहे.



