करमाळा शहर व तालुक्यात ‘बंद’ला चांगला प्रतिसाद..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१४) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे मुख्य मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज (ता.१४) संपूर्ण ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. यासाठी सकल मराठा समाजाचे केलेल्या आवाहनाला करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक व व्यापारी यांनी १००% बंद पाळून आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
करमाळा शहरातील पोथरेनाका परिसर, छत्रपती चौक भवानीनाका परिसर तसेच मेनरोड, दत्तपेठ, राशीनपेठ, गुजरगल्ली, मारवाड गल्ली, वेताळपेठ येथील दुकानदार,व्यापाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. आज सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
करमाळा तालुक्यातील जेऊर, केम, वीट, कोर्टि या मोठ्या बाजारपेठांसह अनेक गावांतही बंदला सकारात्मक प्रतिसाद दिला परंतु या बंद मुळे शहरातील व तालुक्यातील हातगाडी व फळविक्रेते यांनीही आपले दररोजचे विक्री बंद ठेवले होते. तसेच अनेक नागरिकांना या पुकारलेल्या बंद मुळे काही वस्तू खरेदी तसेच महत्वाचे कामे झाली नाहीत. एकंदरीतच या बंदमुळे आज सर्वत्र शांतता होती.
- जेऊर कडकडीत बंद – जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला व्यापारी वर्गाने दिला पाठिंबा
- जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी केम येथे कडकडीत बंद