ग्रामसेवक लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

करमाळा(ता.16):देवळाली ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये झालेल्या अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी ग्रामसेवक अंगद लटके यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 333/2025 अन्वये भादंवि कलम 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात) आणि 409 (शासकीय नोकरीतील फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर श्री. लटके यांनी बार्शी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, दि. 18 जून 2025 रोजी बार्शी न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला होता.
त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दुसरा अर्ज दाखल केला. मा. उच्च न्यायालयाने त्या अर्जावर सुनावणी करताना, ग्रामसेवक यांनी तपासात पूर्ण सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश देऊन अटकपूर्व जामीन तूर्तास मंजूर केला आहे.
या खटल्यामध्ये ग्रामसेवक अंगद लटके यांच्या वतीने ॲड. सचिन देवकर व ॲड. विनोद चौधरी यांनी युक्तिवाद सादर केला, तर शासनाच्या वतीने ॲड. प्रशांत जाधव यांनी बाजू मांडली.
