निराधार, श्रावणबाळाचे अनुदान दोन महिन्यापासून प्रलंबित
करमाळा (दि.२३) : लाडक्या बहिणींना खूश करून महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत अभूतपुर्व बहुमत मिळवले. परंतु संजय गांधी निराधार व श्रावणबाळ, विधवा आदी योजनांचे तालुक्यातील १३ हजार लाभार्थ्यांना अजुनही दोन महिन्यांचे अनुदान दिलेले नाही. हे अनुदान कधी मिळणार; याची प्रतिक्षा या लाभार्थ्यांना आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करून पात्र प्रत्येकी एका महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रूपयांची मदत दिली. आत्तापर्यंत सर्व महिलांना पाच महिन्यांचे साडेसात हजार रूपये मिळाले आहेत. याचा परिणाम म्हणून महायुती सरकारला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाले. करमाळा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्ग असे एकूण १३ हजार लाभार्थी आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पंधराशे रूपये लाभ दिला जातो. दिवाळीत लाभार्थ्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रूपये मिळालेले होते. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे वयोवृध्द व निराधार यांची उपासमार होत आहे. तरी शासनाने याबाबीकडे लक्ष देऊन त्वरीत निराधार अन् श्रावणबाळाचे अनुदान द्यावे; अशी मागणी लाभार्थ्यांमधून केली जात आहे.