करमाळा नगरपरिषद व ज्ञानेश्वर वाचन मंदिरतर्फे सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

करमाळा : श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय आणि करमाळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालयीन प्रमुख स्वप्निल बाळेकर यांच्या हस्ते सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना बाळेकर म्हणाले, “भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५६२ पेक्षा अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताची निर्मिती केली. त्यांची दुरदृष्टी, धैर्य आणि नेतृत्वगुण आजही प्रेरणादायी आहेत. एकता हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.”

पुढे ते म्हणाले, “अमेरिकेसारख्या प्रगत देशात आजही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही, मात्र भारतात कणखर नेतृत्वाच्या इंदिरा गांधी यांनी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करत सक्षम नेतृत्व सिद्ध केले.”

या कार्यक्रमास सोमनाथ सरवदे, शशांक भोसले, आकाश वाघमारे, विपुल पुजारी, हिंदुराव जगताप, शितल बहाड, आश्विनी जाधव, सुप्रिया पालखे, सचिन घाटुळे, सचिन कांबळे, संकल्प शहाणे, तुषार टांकसाळे, विक्रम कांबळे, मल्हारी चांदगुडे, प्रदीप चौकटे, गजानन राक्षे, बाबा खराडे, दत्तात्रय घोलप, अजिम खान तसेच वाचनालयाचे सभासद, वाचक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ सरवदे यांनी केले, तर शशांक भोसले यांनी आभार मानले.



