माजी आमदार जयवंतराव जगताप यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली भेट

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२:महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी आमदार जगताप यांनी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल पालकमंत्री ना. गोरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, आगामी काळातील विकासकामांवर तसेच करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात स्थिर व सक्षम प्रशासन निर्माण करण्याची चर्चा झाली असून, त्याचा लाभ ग्रामीण भागाच्या विकासासाठी निश्चितच होईल, असा विश्वास पालकमंत्री ना. गोरे यांनी व्यक्त केला.


माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही आपल्या भूमिका स्पष्ट करताना, तालुका व जिल्ह्याच्या हितासाठी योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल, विलासराव घुमरे सर, गणेश चिवटे, शंभूराजे जगताप, मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या भेटीमुळे करमाळा तालुक्यातील महयुतीच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.


