पालकमंत्र्यांनी घेतली नारायण पाटलांची भेट - प्रचारासाठी पालकमंत्र्यांचा करमाळा दौरा.. - Saptahik Sandesh

पालकमंत्र्यांनी घेतली नारायण पाटलांची भेट – प्रचारासाठी पालकमंत्र्यांचा करमाळा दौरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.१०) माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आहे, भेटीदरम्यान, माजी आमदार नारायण पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी बंद खोलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. पण या नेत्यांमध्ये नेकमी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही, भाजपचे माढ्याचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील करमाळा दौऱ्यावर आले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला होता. यावेळी मात्र ते कोणाला समर्थन देणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण पाटील यांची नियोजनात नसताना ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

करमाळा दौऱ्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या भेटी ठरलेल्या होत्या. या नियोजनात माजी आमदार नारायण पाटील यांची भेट नव्हती, मात्र चंद्रकांत पाटील यांनी जेऊर येथे त्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मात्र माढा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पाटील समर्थकांमध्ये लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत संभ्रम आहे, नारायण पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. या निवडणुकीत नारायण आबांनी भविष्यात ठामपणे पाठीमागे उभा राहणाऱ्या नेत्याबरोबर राहावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरु आहेत.

मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. नारायण पाटील यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. आजही तालुक्यांमध्ये पाटील यांचे वजन अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतल्यामुळे करमाळा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!