आयुष्यभर सेवा केलेल्या शाळेला शिक्षकाची कृतज्ञतेची भेट

करमाळा(दि. १): शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून तो आपल्या कर्तृत्वाने शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा भाग्यविधाता असतो. खडकी (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक विलास गुरूलिंग शिराळ हे याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात याच शाळेत केली आणि आयुष्यभर सेवा देऊन इथूनच निवृत्त झाले. आपल्या कर्मभूमीप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शाळेस एक विशेष भेट दिली.

शाळेच्या परिसरातील अर्धवट असलेले कंपाउंड पूर्ण करून त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून आर.सी.सी. कमान व गेट उभारून शाळेस एक सुंदर स्मृतीचिन्ह बहाल केले.
31 जुलै 2025 रोजी या कमान व गेटचे उद्घाटन शिक्षणविस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ, सरपंच उमाकांत बरडे, उपसरपंच अंगद शिंदे, व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका कुंभार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

हा उपक्रम केवळ एका शाळेच्या विकासाचा नाही, तर शिक्षकाच्या आपल्या कार्यभूमीशी असलेल्या नात्याची साक्ष आहे. विलास शिराळ गुरुजींच्या या कृतज्ञतेच्या भावनेतून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळावी, हीच खरी शिक्षकी परंपरेची शान आहे.

कार्यक्रमाला अमोल कुंभार, ईश्वर खरात, भारत मिरगे तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महादेव शिंदे, प्रविण शिंदे, सुहास कांबळे, सतीश वीर, सुनिता काळे, शशिकांत क्षिरसागर, राम काळे व इतर शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


