शेलगाव (क) येथे आरोग्य शिबिर – 260 नागरिकांचा सहभाग..

संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेलगाव (क) (ता.करमाळा) येथे ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 11 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, 12 ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर, कुस्ती आखाडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या आयोजित आरोग्य शिबिरात तब्बल 260 नागरिकांनी लाभ घेतला. त्यापैकी 40 वर्षांवरील 178 रुग्णांची नेत्रतपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना पुढील तारखा निश्चित करून ऑपरेशनसाठी पाठविण्यात आले. दरम्यान, रक्तदान शिबिरात 71 जणांनी उत्साहाने रक्तदान केले.

हे शिबिर मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल, करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महंमदवाडी, हडपसर, पुणे), सुविधा हॉस्पिटल (बार्शी), सुश्रुत हॉस्पिटल (बार्शी), उपजिल्हा रुग्णालय (करमाळा) तसेच मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटलचे डॉ. ओंकार उघडे यांनी सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रदीप बनसोडे यांनी विशेष मेहनत घेतली.


