हिसरे येथील गरजू विद्यार्थ्यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने मदत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कोरोना काळात आई- वडिलांचे छत्र हरपलेले किंवा एकल पालक राहिलेले अनाथ, गरीब, गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, त्यांना आर्थिक, मानसिक, शैक्षणिक आधार मिळावा व त्यांनी शिक्षण पूर्ण करावे, या हेतूने करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम, शेटफळ ना., हिसरे या गावांतील अशा बालकांचे शैक्षणिक पालकत्व ‘जगदीशब्द फाउंडेशन’च्या वतीने घेण्यात आले आहे. नुकतेच हिसरे (ता.
करमाळा) येथील विद्यार्थ्यांना जगदीशब्द फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या विचारांतून हे विधायक काम सुरू आहे. या विद्यार्थ्यांना मागील सलग चार वर्षांपासून फाउंडेशनच्या वतीने सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे.

याप्रसंगी जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक जगदीश ओहोळ, उद्योजक अशोक शिंदे, कवी तानाजी शिंदे, सोगाव येथील स्वप्नील गोडगे (माजी सरपंच),नारायण भोसले, अनिल भोसले, भरत भोसले, पविन भोसले, नितीन भोसले, हर्षद भोसले यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


