सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींना सन्माननिधी दिला जावा

करमाळा (दि.२६) – सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींना शासनाकडून पेन्शन रुपात दरमहा दहा हजार रुपये सन्माननिधी दिला जावा तसेच हा विषय आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी मुख्यमंत्र्यासहित विविध पक्षाच्या प्रमुखांना पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठराविक कालावधीच्या प्रकल्पामध्ये सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे शासकीय पेन्शन किंवा अन्य आर्थिक सपोर्ट मिळत नाही. ज्या पद्धतीने वृद्ध कलाकारांना कला सादर केल्याचा पुरावा दाखल केल्यानंतर त्यांना दरमहा पाच हजार रुपये मिळतात. त्याच धर्तीवर स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केलेल्या परंतु साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये सन्मान निधीची तरतूद करून त्यांचा यथोचित सामाजिक सन्मान करावा. हा विषय आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात यावा. यात राजकिय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश नसावा असा देखील पत्रात त्यांनी उल्लेख केला आहे.
या पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल, लोकसभा सदस्य वंदना चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींना पाठवले आहे.







