‘वांगी’च्या सुपुत्राचा राज्यस्थान मधील ‘जयपूर’ येथे सन्मान..
चिखलठाण (संदेश प्रतिनिधी)- नॅशनल असोसिएशन ऑफ ॲनिमल सायंटिस्ट संस्थेच्यावतीने पशुवैद्यकीय क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल (वांगी ता करमाळा) डॉ.राहूल देशमुख यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
जयपूर राजस्थान येथील अपोलो कॉलेज ऑफ व्हेटरीनरी मेडिसीन या ठिकाणी महाराष्ट्र पशू वैद्यकीय आणि मत्स विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी राज्यस्थान येथील विविध पशू वैद्यकीय विद्यापीठातील कुलगुरू, सहयोगी अधिष्ठाता, संचालक, प्राध्यापक तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
डॉ.राहुल देशमुख हे वांगी तालुका करमाळा येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल येथे झाले आहे. मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून स्विडन येथे पदवीत्तर पदवी घेत स्विडन व डेन्मार्क येथे येथील विद्यापीठात संशोधन करून पी.एच.डी. संपादन केली आहे.
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर भारतात येऊन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयालयात पाच वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून काम पाहिले. काही काळ हॉपकिंग या नामांकित कंपनीत उचपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते.सध्या त्यांनी स्वतः ची मुंबई येथे जनावरांच्या अनुवंशिक आजारांचे अचूक निदान करण्यासाठी दोन ठिकाणी अद्यावत प्रयोगशाळा सुरू केल्या असून, पशुवैद्यकीय क्षेत्रातील विशेष संशोधन करत आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील विविध कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.