मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक : जेऊर उपसरपंच अंगद गोडसे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात माझा समावेश झालेला नाही, माझा कसलाही संबंध नाही असे जेऊरचे विद्यमान उपसरपंच अंगद गोडसे यांनी सांगितले.
जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक चालू असून, उपसरपंच अंगद गोडसे यांनी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु आज (ता.२३) स्वतः अंगद गोडसे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे भेट घेतली व कालची घटना कशी झाली हे सांगीतले.
याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना अंगद गोडसे यांनी सांगितले की, मी काल माझ्या वैयक्तिक कामासाठी टेंभुर्णी येथे गेलो असता परत गावी येत असताना शेलगाव (वा) चौकात जेऊर येथील नागरीक थांबले असल्याचे दिसून आले. मी उपसरपंच असल्याने काही अडचण असेल ते पहावे म्हणून तेथे थांबलो असता तेथे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे आले व त्यांनी माझ्याशी कसलीही चर्चा नाही करता थेट माझा सत्कार केला व मी त्यांच्या गटात प्रवेश केला असल्याचे सांगीतले.
वास्तविक पाहता मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असतानाही जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु असताना पाहून आमदार शिंदे गटाकडून जर माझ्यासारख्या जबाबदार पदाधिकारी बाबत अशी फसवणूक करून गट प्रवेश झाल्याचे सांगीतले जात आहे. मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून त्यांनी जेऊर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर राहून काम करण्याची संधी दिली आहे, चालू निवडणुकीत सुद्धा माजी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचे सरपंच पदासह सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार अशी खात्री उपसरपंच अंगद गोडसे यांनी बोलून दाखवली.