शासकीय फी व्यतिरिक्त कोण जास्त पैसे घेत असल्याचे आढळून असल्यास थेट संपर्क साधावा : तहसीलदार शिल्पा ठोकडे
करमाळा : करमाळा तालुक्यातील साडेपाच महिन्यात २१ हजार १३५ कुणबीचे दाखले दिले असून, जातीचे दाखले काढण्यासाठी शासकीय फी वगळता एक रुपयाही जास्त कोणाला देऊ नये, दाखले काढण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त कोण जास्त पैसे घेत असल्याचे आढळून असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.
याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कुणबीचे दाखले करमाळा तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत. प्राधान्याने जातीचे दाखले देण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या शाळा, कॉलेज सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत कोणाची गैरसोय होऊ नये, याबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कुणबीचे २१ हजार १३५, मुस्लिम ओबीसी ३६८, अल्पसंख्याक २ दाखले दिले आहेत, याशिवाय उत्पन्नाचे दाखले १ हजार ११६ दिले आहेत.
नागरिकांनी महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अन्य व्यक्तींची संपर्क साधू नये, काही लोक दाखले काढण्यासाठी एजंट म्हणून काम करत असून, ते पैसे घेत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. कोणी व्यक्ती दाखले काढून देतो म्हणून पैसे मागत असेल असे निदर्शनास आल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. – शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा