मुलं रडली तर रडू द्या,पण मोबाईल देवू नका : पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.22) : मुलं रडली तर रडू द्या पण त्यांना मोबाईल देऊ नका अन्यथा मुलांचा मेंदू बाद झाल्याशिवाय राहणार नाही. असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.
करमाळा येथे मेहर आय अँड डेंटल हॉस्पिटलच्या शुभारंभासाठी पद्मश्री तात्याराव लहाने हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह डॉक्टर रागिनी पारेख तसेच,विद्या विकास मंडळ सचिव विलासराव घुमरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथराव कांबळे,धुळा भाऊ कोकरे याच प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड.राहुल सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष वारे, महादेवांना फंड आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ तात्याराव लहाने म्हणाले की, सध्या आपण एक वेगळे युगात म्हणजे मोबाईलच्या युगामध्ये आपण वावरत आहोत मोबाईलच्या योगाने आज समाजातील संपूर्ण चित्र विचित्र होत चाललेला आहे. लहान मुलांच्या दृष्टीने मोबाईल देणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. सहा वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल मुळीच देऊ नये. सहा वर्षानंतर 24 तासात फक्त दोन तास व मोठ्यांनी चार तास वापरावा. मोबाईल शरीरापासून 16 इंच दुर ठेवावा. मोबाईल मुळे डोळ्यासह संपूर्ण शरीराचं नुकसान होत असल्यामुळे प्रत्येकाने मोबाईल किती कसा वापर करावा याचा विचार करण्याची गरज आहे.
यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख महेश चिवटे, आदनाथचे माजी संचालक दशरथराव कांबळे तसेच विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे यांचे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार संजय मामा शिंदे व पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने तसेच सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डाॅ.रागिनी पारेख यांच्या उपस्थितीमध्ये या मेहर हॉस्पिटलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले .उपस्थितांचे स्वागत डॉ.हितेश मेहेर तसेच बाळासाहेब मेहर, दिनेश मेहर ,बबनराव मेहर, देवकर गुरूजी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. हितेश मेहेर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले.
डॉ.हितेश बाळासाहेब मेहेर हा माझा विद्यार्थी असून तो तीन वर्षे माझ्याबरोबर कार्यरत होता. माझ्याबरोबर दहा ते बारा तास काम करणारा अतिशय गुणी आणि अतिशय विद्वान असा डॉक्टर आहे.त्यांने 1500 लोकांच्या नेत्र शस्त्रक्रियाही केल्या पण एकही तक्रार नाही. तुम्ही तात्याराव लहाने समजूनच त्याच्याकडे तुमचे डोळे सोपवा.ग्रामीण भागातील डॉक्टरांना मदत करण्याची गरज असते.जर तालुका पातळीवर अशा प्रकारचे अध्ययवत रुग्णालय होत असेल तर मी माझ्या विद्यार्थ्याच्या उद्घाटनाला नक्की जात असतो.आजचं माझंही 163 व उद्घाटन असून माझे 163 विद्यार्थी ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांची सेवा करत आहे आणि अशाच प्रकारचे सेवा हा हितेश करणारा असून आपण सर्वांनी त्याच्याकडे या. एवढंच नाही तर मला जसं जमेल असं किमान दोन-तीन महिन्यातून निश्चित प्रकारे तुमची सेवा करण्यासाठी करमाळ्यात येईल असेही डॉक्टर तात्याराव लहाने यांनी यावेळी सांगितले.