विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.11) : कोणत्याही क्षेत्राचा परिपूर्ण विकास करायचा असेलतर पायाभूत सुविधा मिळवल्या पाहिजेत तरच विकास होवू शकतो. वरवर कामे करून कधीही प्रगती होत नाही. त्यामुळे करमाळा मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपण दीर्घकालीन उपयुक्त असणाऱ्या योजनांवर भर दिला आहे व ती कामे करत आहोत, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. तालुक्यातील विकासात्मक कारकिर्दीचा
आढावा देताना आमदार शिंदे सा. कमलाभवानी संदेशशी बोलत होते. ते म्हणाले, की आमदार होण्यासाठी अनेकांना धडपड करावी लागते. विशेषत: १५-२० वर्ष संघर्ष करावा लागतो. माढा मतदार संघातून आमदार बबनदादा शिंदे यांना आमदार होण्यासाठी आमच्या वडिलानंतर २० वर्षे संघर्ष करावा लागला व नंतर ते आमदार झाले. मी त्या मानाने सुदैवी ठरलो. पहिल्या निवडणुकीत अपयश आले तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे करता आली.
त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी विश्वास टाकला व त्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. सुरूवातीला महाविकास आघाडीला पाठींबा दिला. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अनेक कामांना पाठबळ मिळाले. पूर्वी वीजेच्या संदर्भात कामेच थांबलेली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज पाहून मी कात्रज, कोर्टी, कोळगाव ॲडीशनल ट्रान्सफार्मर मंजुर केले आहेत. आवाटी येथे सबस्टेशन, पांडे येथे लोड असल्याने तेथे ॲडीशनल ट्रान्सफार्मर, कविटगाव येथे ॲडीशनल ट्रान्सफार्मर मंजूर केले आहेत. राजुरी, रावगाव येथेही सबस्टेशन मंजुर केले आहे. कात्रजचे काम पूर्ण झाले असून, कोर्टी येथील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पांडे येथील कामही लवकरच सुरू होत आहे. उर्वरित कामेही क्रमाक्रमाने पण वेळेत पूर्ण होतील. डिकसळ पुलाचे टेंडर निघालेले आहे. ते कामही लवकरच पूर्ण
होईल. तालुक्यातील एमआयडीसी कार्यान्वीत होण्यासाठी अनेक वर्षाचा रखडलेला प्रकल्प म्हणून त्याकडे लक्ष दिले. तेथे रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. पाण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्लॉटिंगचे दर शासनाने २० लाख रूपये एकर काढले आहे, ते कमी होण्यासाठी शासनाच्या पाठीशी लागलो आहे.
जातेगाव ते टेंभूर्णी हा राष्ट्रीय मार्ग मंजूर केलेला आहे. दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना देण्यासाठी योग्य ते नियोजन सुरू आहे. मांगी तलावात कुकडीतून पाईपद्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. परंतू तो प्रस्ताव यशस्वी होण्यास काही अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे कुकडीचे पाणी उजनी जलाशयात सोडून उजनीवरून वाशिंबे, रिटेवाडी, मोरवड व केत्तूर, चिलवडी, सावडी असे दोन सिंचन योजना करण्याबाबत आपण प्रयत्नशील आहोत.
कुकडीचे पाणी गेल्या ३५ वर्षात शेतीसाठी मिळालेले नाही. वास्तविक पाहता कुकडीच्या माध्यमातून २४ हजार ५०० हेक्ट क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. परंतू कुकडीच्या डाव्या कालव्यातून हे पाणी येऊ शकत नाही. कारण १९४ किलोमीटर नंतर करमाळा तालुका सुरू होतो व या अंतरात येईपर्यंत पाणी जवळपास वरच्या लोकांनी घेतलेले असते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मी व आमदार रोहित (दादा) पवार यांनी प्रयत्न करून कॅनॉलची दुरूस्ती केली आहे. त्यामुळे पूर्वी ३०० क्युसेसने येणारे पाणी ६५० क्युसेसने येऊ लागले आहे.
कुकडीचे आवर्तन ९ ते १५ दिवसासापेक्षा जास्त मिळत नाही. साधारणतः एक महिना कॅनॉलने पाणी आल्यानंतर १ टीएमसी पाणी येते. जर आर्वतनच १५ दिवस असेल व त्यात कमी क्षमतेने पाणी येत असेलतर शेतीची तहान कशी भागणार ? यामुळे कुकडीचे पाणी उजनीत व उजनीतून उपसासिंचनद्वारे तालुक्यात आणण्याचा मानस असून आपण त्याकरीता प्रयत्न करत आहोत.
करमाळा तालुक्यातील वरीष्ठ स्तर न्यायालय उभा करण्यासाठी आपण जे प्रयत्न केले त्यास यश आले असून हे न्यायालय सुरू झाले आहे. याशिवाय कुकडी व दहिगाव योजनेसाठी संपादन झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नगरपालिकेची बिल्डींग, टाऊन हॉलची बिल्डींग, १०० कॉटचे उपजिल्हा रुग्णालय अशी महत्वाची पायाभूत कामे आपण केलेली आहेत. केंद्रशासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे धोरण शिथील होताच तालुक्यात आपण वस्त्रोद्योगाबाबतचा व्यवसाय उभारण्याचे धोरण आहे.
तालुक्यातील जनसंपर्क मोहिमेत नागरीकांचा दांडगा संपर्क झाला आहे. कोणी टिका करो, अथवा पाठबळ देवो ही बाब माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. परंतू गावागावातील नागरीकांच्या समस्या समजावून घेणे व त्या जितक्या लवकर सोडविता येतील त्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. मध्यंतरी मुंबईला जास्त वेळ द्यावा लागत होता. आता सरकार बदलल्याने वेळ हाताशी असल्याने सर्वांना भेटून कामे समजून घेत आहे व यापुढेही कामे करणार आहे. नागरीकांनी आपल्या समस्या मधल्या माणसाला न सांगता थेट माझ्याशी संपर्क साधावा; असेही आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.
