जनावरांची अवैध वाहतूक करमाळा पोलिसांकडून 14 जनावरांची सुटका

करमाळा (दि.14): करमाळा पोलिसांनी दोन दिवसांत सलग दोन कारवायांमध्ये निर्दयीपणे गोवंश प्राण्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत एकूण १४ जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवायांमुळे बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सावडी-करमाळा मार्गावर ६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नाकाबंदी करून एक पांढरा पिकअप (क्र. एमएच 04 डीडी 1723) पकडला. तपासणीदरम्यान दोन गिर जातीच्या गाई व एक जरशी खोंड अशा तीन जनावरांची दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता वाहतूक होत असल्याचे आढळले. वाहन चालक सोयब सलीम कुरेशी (रा. करमाळा) असून, तो अकबर मुनिलाल मुजावर (रा. पांडे, ता. करमाळा) यांच्या सांगण्यावरून जनावरे नेत असल्याचे समोर आले.

तर, ७ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जामखेड नाका येथे वाहतूक शाखेने मोठी कारवाई करत ११ गोवंश प्राणी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी केशरी रंगाचा आयशर टेम्पो (एम. एच. 44 Y 3883) थांबवून तपासणी केली असता, १ जरशी गाय, २ पांढरे बैल, २ काळे बैल, ३ लाल बैल, १ भुरा बैल व २ काळ्या टिपक्याचे बैल अशी एकूण ११ जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळली.

या प्रकरणात इंजेमामुलहक अजीजुलहक सय्यद (रा. खडकपूरा, ता. आंबेजोगाई, जि. बीड) आणि अफरोज जामालुद्दीन सय्यद (रा. पिंपडा, ता. आंबेजोगाई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी जनावरे सोयब कुरेशी (रा. आंबेजोगाई) यांच्या मालकीची असून, आंबेजोगाई येथून कर्नाटकातील ओसपेट येथे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.

दोन्ही कारवायांमध्ये जनावरांची वैद्यकीय तपासणी करून पंचनामा करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 व महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
करमाळा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.



 
                       
                      