सिना नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर अनिवार्य – माढा उपविभागीय दंडाधिकारींचा आदेश

करमाळा (ता.26 सप्टेंबर) : अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सिना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून सिना कोळगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे करमाळा व माढा तालुक्यातील नदीकाठच्या व आसपासच्या गावांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माढा विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी सौ. जयश्री आव्हाड यांनी भारतीय नागरीक सुरक्षा कायदा 2023 अंतर्गत तात्काळ स्थलांतराचा आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार प्रभावित गावे
करमाळा तालुक्यातील निलज, बोरगाव, खडकी, बिटरगाव श्री, तरटगाव, आळजापूर, आवाटी, पोटेगाव, बाळेवाडी तर माढा तालुक्यातील लहु, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, पापनस, रिधोरे, तांदुळवाडी, निमगाव महातपुर, दारफळ, सुलतानपूर (राहुलनगर), केवड, उंदरगाव, वाकाव, खेराव, कुंभेज, लोणी, कव्हे, महादेववाडी, म्हैसगाव व मानेगाव येथील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाचा इशारा
अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरपाण्यासोबत सर्प, विंचू यांसारखे धोकादायक प्राणी गावात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा धोका असल्याने पूरस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

विशेष सूचना
पूरग्रस्त भागात पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी स्थलांतराचे आदेश पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, माढा विभाग, कुर्डुवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.


