देवळालीत रस्त्याच्या कारणावरून चौघाकडून एकास बेदम मारहाण – गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : रस्त्याच्या कारणावरून चौघांनी एकास बेदम मारहाण केली असून भांडण सोडविण्यास गेलेल्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा प्रकार २९ ऑक्टोबरला सकाळी सव्वानऊ वाजता देवळाली येथे घडला आहे. या प्रकरणी नागेश मच्छिंद्र ढेरे (वय ३२, रा. देवळाली) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझा चुलत भाऊ संतोष ढेरे तसेच सोमनाथ ढेरे यांच्यात रस्त्याच्या कारणावरून वाद आहे. त्यानुसार गावातील सतीश कानगुडे यांनी २९ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता फोन करून गावातील किरण गोसावी यांचे हॉटेलमध्ये ये.. तुमचा वाद मिटवू.. असे सांगितले. त्यावेळी मी तसेच माझा चुलतभाऊ जोतिराम ढेरे व मेहुणा भीमराव बाबूराव फुके यांना घेऊन तेथे गेलो.
त्यावेळी तेथे गहिणीनाथ ननवरे व सतीश कानगुडे यांनी काय झाले विचारले असता.. मी त्यांना यांनी माझे दगड घालून पाईप फोडले असे सांगताच संतोष ढेरे व सोमनाथ ढेरे यांनी आम्ही तुझे पाईप फोडलेले नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुर्चीवरून खाली पाडले. तसेच संतोष ढेरे याने माझे पाठीवर व डाव्या हाताच्या पोटरीवर जोराचा चावा घेतला. तर लक्ष्मी ढेरे हिने मला हाथाने मारहाण केली. माझा चुलत भाऊ जोतिराम ढेरे व मेहुणा भीमराव फुके हे भांडण सोडविण्यास आले असता, त्यांनाही तिघांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.